10/5/14

महाराष्ट्र कोणाचा?



सेना आणि भाजप ची युती तुटेल असे मला कधीच वाटले नाही. जाग अधिक हव्यात अशी मागणी सगळ्या राजकीय पक्षांची असते आणि असायलाही हवी. आणि या मुद्द्यावरुनच बहुतांश राजकीय युत्या तुटतात पण सेना-भाजप युती हि केवळ राजकीय युती मानता येइल का? गेल्या पंधरा वर्षात 'सेक्युलारिजम्' या वाह्यात आणि भ्रष्ट विचारसरणीच जे स्तोम माजले आहे, याला वैचारिक, बौध्दीक आणि त्यान्वये राजकीय पातळीवर सातत्याने विरोध करणारे आणि जन-मानसाचा पाठिंबा असणारे केवळ दोनच पक्ष भारतात नजरेत येतात, शिवसेन आणि भाजप. त्यामुळे त्यांची युती हि केवळ राजकीय पटलावरची नसुन ती एका भ्रष्ट आणि भारतविरोधी विचारप्रणालीला विरोध करायला एकत्रित आलेल्या शक्ति होत्या. त्यामुळे निव्वळ जागा-वाटपावरुन ही युती तुटणे आणि हिंदुंची मते परत फुटुन त्याचा फायदा काँग्रेस किंवा शरद पवारांना होणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेणे नव्हे तर काय?

असला भावनिक विचार आमच्या सारख्या सामान्यांनी करावा, राजकारण्यांनी नव्हे. जिथे भावना मधे आल्यात तिथे राजकारण संपल आणि सत्तेच्या खेळात जेंव्हा राजकारण संपत तेंव्हा राजकीय पटलावरचा खेळ संपुष्टात आल्याची पहिली घंटा झाली असे समजावे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमधे मोदी लाट होती हे आता निर्विवाद सिध्द झाले आहे. त्यामुळेच मे महिन्या नंतर झालेल्या कुठलिही निवडणुक असो, मोदी लाट नक्कीच ओसरली आहे असा दावा केला जातो. लोकसभेचे मुद्दे आणि स्थानिक आणि प्रांतिय मुद्दे यात तफावत असते यात वाद नाही पण मोदी लाट हि केवळ मोदींमुळेच नव्हती तर मोदींच्या मागे भाजपची अत्यंत सशक्त आणि भक्कम निवडणुक यंत्रणाही तेवढीच कारणीभूत होती. ही यंत्रणा भाजपकडे संघाच्या आशीर्वादाने नेहमीच होती पण त्याचा तर्कशुद्ध आणि तंत्रशुद्ध वापर मोदी आणि अमित शहांनी करुन घेतला. आपापसात न भांडणे, स्थानिक मुद्द्यांची अचूक माहिती असणे, त्या मुद्द्यांवर नेमके निदान असणे, विधानसभा किंवा लोकसभेच्या जागेची जातीचे गणित माहिती असणे तसेच अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्याचेही मत वरपर्यंत पोचेल याची काळजी घेणे अश्या अनेक उचलेल्या पावलांनी भाजपला गेल्या वर्षभरातल्या प्रांतीय आणि राष्ट्रीय निवडणुकांमधे भरभरून यश मिळाले. महाराष्ट्रात जरी मोदी लाट नसेल तरी भाजपची ही यंत्रणा काय मिळवु शकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मागल्या वर्षीच्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि दिल्लीतील विधानसभा निवडणुका होय. या तीन राज्यांपैकी राजस्थान प्रामुख्याने आजच्या महाराष्ट्रा सारख्या परिस्थितीत होते. तिथे काँग्रेसला जनतेनी मागल्या विधानसभेत पुन्हा निवडुन दिले आणि मग पुढली पाच वर्षे ही जनता पश्चाताप करित बसली. काँग्रेस विरोधी इतकी लाट होती की भाजप जिंकुन येणे दगडावरची रेघ होती. तरीही भाजपचे राजस्थान मधी यश थक्क करण्याजोगे होते. थोडक्यात मोदी लाट असो किंव्हा नसो, भाजपची शक्ती गेल्या वर्षभरात चांगलीच वाढलेली आहे हे मानायला हरकत नाही.

महाराष्ट्र काही दिल्ली नव्हे, राजस्थान नव्हे किंव्हा मध्य प्रदेशही नव्हे हे मान्य. पण केवळ महाराष्ट्राचा विचार करता येथेही भाजपने सातत्याने आपले बळ वाढवले आहे. विदर्भ एके काळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जात असे, तेथे फक्त भाजप आणि त्यांच्यामुळे शिवसेनाच निवडुन आलेली आहे. अगदी २००९ च्या लोकसभेतही विदर्भातून भाजपला ११ पैकी ५ जागा मिळाल्या होत्या. गेल्या विधानसभेत तर भाजपने शिवसेनेपेक्षा कमी जागा लढवुन अधिक जागा मिळविल्या होत्या. अश्या सगळ्या परिस्थितित जर का भाजप ने अधिक जागांची मागणी केली तर त्यात काय वावगे आहे?

निवडणुका भावनांवर जिंकल्या जाउ शकत नाही, त्यासाठी मते मिळवावी लागतात. गेली दहा वर्ष महाराष्ट्रात सातत्याने कामे करुन आपली जनशक्ती जर का भाजप ने वाढवली असेल तर त्यांनी अधिक जागा लढविणे तर्कशुद्ध ठरेल. पण तर्कशुद्ध वगैरे तर दूरच्या गोष्टी, सेना ज्या तोर्‍यात वावरते आहे ते बघुन एक विचारवस वाटत की भाजपने कमी जागा लढवायच्यात की अधिक हा निर्णय शिवसेनेला कोणी दिला? एक राष्ट्रीय पक्ष, ज्याने गेल्या वर्षभरातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधे सर्वदूर दणदणीत विजय प्राप्त केलाय, जर का अधिक जागा महाराष्ट्रात लढविल तर सत्तेत परत येण्याचा मार्ग सुकर होईल हे शिवसेनेच्या ध्यानात का येत नाही या? खरे तर २००९ लाच भाजप-शिवसेन मुंबईत विजयी ठरायला हवी होती पण शिवसेना त्यांच्या घरातले तंटे चव्हाट्यावर येण्यापासुन थांबवु शकली नाही. त्याचा परिणाम असा की मतविभागणी होउन किमान २०-२५ जागा शिवसेनेनी गमाविल्यात. या सगळ्या प्रकरणात भाजपची काय चूक? या सगळ्या मुद्द्यांचा व प्रश्नांचा सारासार विचार उद्धव ठाकर्‍यांनी केला असता तर युती त्यांनी तुटु दिली नसती. पण राजकीय पक्ष समाजकार्याचे साधन नसुन एका घराण्यापूर्तीच आणि घराण्याचीच मालमत्ता बनुन रहातो तेंव्हाच असल्या चूक घडतात.


हि युती तुटण्याचा तोटा भाजपला आणि शिवसेनेला, दोघांना होणार. पण हा सोटा दोघांना वेगवेगळा आणि वेगवेगळ्या ठिकाणी लागेल. उद्या जर का अगदी भाजप ला वाटल्या तेवढ्या जागा मिळाल्या नाहीत तरी भाजप दिल्लीत दृढ आहेच आणि त्या व्यतिरिक्त संपूर्ण उत्तर भारतात ते सगळ्यात खंबीर पक्ष आहेत. बंगाल मधे भाजप नी नारळ फोडलाच आहे आणि पुढल्या निवडणुकीत कर्नाटक परत भाजप कडे येण्याची दाट शक्यता आहे. सीमांध्रात भाजप चंद्राबाबू द्वारे सत्तेत आहे आणि तेलंगाणातही भाजपने पाळमूळ टाकली आहेत. थोडक्यात, महाराष्ट्रात तडाखा बसला तरी भाजप पक्ष म्हणुन अजुन शक्तिशाली होतच जाणार. पण जर का शिवसेनेला वाटल तेवढ यश नाही मिळाल तर युती तोडण्याच सौदा सेनेला काय भावात पडेल?

या नविन समिकरणातून तीन वेग-वेगळ्या परिस्थिती समोर येउ शकतात:

१) एकत्रित निवडणुका लढले असते तर दणदणीत विजय मिळाला असता हे नक्की. पण आता परिस्थिती थोडी वेगळी उभारेल. भाजपला शंभरच्या घरात जागा मिळतील आणि ते सगळ्यात मोठा पक्ष म्हणुन उभारतील. बहुमत नसल्यामुळे त्यांना पाठिंबा लागेलच. अश्या परिस्थितीत शिवसेना भाजप ला पाठिंबा देणार नाही अस होण शक्य नाही अस आत्ता तरी वाटत. (राजकारणात अशक्य काहीच नसत हे लालु-नितिशने दाखवुन दिले आहेच)

२)वरील परिस्थिती निर्माण नाही झाली आणि  शिवसेना आणि भाजप ला साधारण समान जागा मिळाल्यात आणि त्यांचे गठबंधन होउनही बहुमताला काही जागा कमीच पडतील. तर मग भाड्याच्या विधायकांची जमवा-जमव करण्यात मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार हे सांगता येण कठीण आहे. या भानगडीत एक डळमळीत सरकारची स्थापना होईल.

३) सगळ्यात वाईट परिस्थिती मात्र जर 'तुला ना मला घाल कुत्र्याला' या म्हणीनुसार जर का काँग्रेस आणि पवार परत सत्ता प्रस्थापित करु शकले तर भाजप आणि सेनेचा युती तोडण्याचा गुन्हा अक्षम्य आहे.

जनतेचा कौल कोणाला मिळणार याची वाट फार वेळ बघावी लागणार नाही. घोडा मैदान जवळ आहे.  

राजकीय संक्षेपण बाजुला ठेउन जर थोड भावनांचा आधार घेउन विचार केला तर अगदी ऐन वेळी युती तुटुन सेना आणि भाजप ने काँग्रेसची मुघली सत्तेचे पाळमुळ खणुन काढण्याची सुवर्ण संधी गमावली असे वाटते. ही औरंगजेबाच्या पिल्लावळांना कायमच नेस्तनाबुत करणे या निवडणुकीत शक्य होते. आता सत्ता कोणाची येवो पण या भाडणांमधे ही गांधी घराण्याची विषवल्ली तगुन राहिल आणि संधी मिळताच परत फोफावणार. आणि यासाठी भाजप आणि सेना दोषी आहेत एवढ नक्की.  



2/10/14

पेशवाईचा र्‍हास - दुष्काळ, इंग्रज-फ्रेंच युध्द आणि आरमार (भाग २)

सेवन इयर्स वॉर
मागच्या दोन लेखांमधे आपण दुष्काळाचे परिणाम, मराठ्यांच्या एका कर्तबगार पिढीचा अचानक अंत आणि भारतावर होणार्‍या परकीय आक्रमणांच्या बदलत्या स्वरुपाचा आढावा घेतला. याच दरम्यान युरोपात एक नविन वादळ निर्माण होत होते. आणि त्याचे प्रतिकुल परिणाम भारतावर झालेत. मी मागच्या दोन लेखात सेवन इयर्स वॉर बद्दल बर्‍याचदा उल्लेख केला. पण आता मागील लेख परत वाचल्यावर अस लक्षात येतय की या लेख मालिकेच्या सुरुवातीलाच सेवन इयर्स वॉर बद्दल चर्चा करायला हवी होती. पेशवाईचा र्‍हास या युध्दामुळे झाला नाही. पेशवाईचा र्‍हास वरच्या पिढीचा मृत्यु आणि एका पाठोपाठ घडलेल्या दुष्काळांमुळे झाला पण त्याचा फायदा इंग्रजांना सगळ्यात जास्त घेता आला ते त्यांच्या सेवन इयर्स वॉर मधील विजयामुळे.

सेवन इयर्स वॉर सन १७५६ ते सन १७६३ या कालावधीतले युध्द होय. हे एक युध्द नव्हत आणि एका ठिकाणीही घडले नाही तसेच हे केवळ दोन राजवटी किंवा राष्ट्रां पर्यंत सिमीतही नव्हते. याला पहिले जागतिक युध्द म्हणायला हरकत नाही कारण हे ज्ञात जगाच्या तीन खंडांमधे लढल्या गेल. इंग्रज आणि फ्रेंच या राजवटींना ज्ञात जगावर सत्ता प्रस्थापित करायची होती आणि मुख्य म्हणजे जागतिक व्यापारवर कब्जा करायचा होता. हे युध्द म्हणजे या दोन राजवटींच्या महत्त्वाकांक्षेची परिणीती होय. या युध्दात अनेक राजवटी सामिल होत्या. युरोपमधे ऑस्ट्रीयन, हॅनोवर, प्रुशियन, रशियन आणि स्पॅनिश सत्ता तर भारतात बंगालचा नवाब आणि उत्तर अमेरिकेत इंग्रजांची १३ संस्थाने (कॉलनी) तसेच अमेरिका खंडातले मूळ-निवासी (रेड इंडियन) राज्ये, या सगळ्यांनी या युध्दात भाग घेतला आणि त्याचे परिणाम भोगलेत. युध्दा अंती मात्र, नशिबाचाच भाग म्हणावा लागेल, फक्त इंग्रजच विजयी ठरलेत. या युध्दाचे परिणाम आणि त्याची सावली कुठपर्यंत पडली याचा विचार आपण पुढल्या लेखात करु. या लेखात नेमके काय घडले याचा आढावा घेउया.
हे युध्द अचानक उद्भवले नव्हते. त्याची बीज किमान दोनशे वर्ष आधी पेरलेली होती. तसेच या युद्धाचा आढावा घेण्यास कालमान थोडा मागेपुढे करुन बघावा लागेल. जिग्-सॉ च कोड कस विभिन्न रंगाची आणि आकाराचे ठोकळे एकत्र केल्यावरच स्पष्ट होत तसेच या युध्दाची पार्श्वभूमी, कारणे, त्यात गुंतलेली राष्ट्रे आणि राजवटी, बदलता काळ आणि तसेच सत्तेची बदलती व्याख्या, व्यापाराच्या आधारावर उभरणार साम्राज्यवादाचा नविन राक्षस आणि सगळ्यात मुख्य म्हणजे मानवी जीवनात आमूलाग्र बदल आणणारे यांत्रिकीकरण आणि औद्योगिकीकरण इत्यादी घटना एकत्र केल्यात तरच या घटनेचे महत्त्व स्पष्ट होते. १७व्या शतक हे इंग्रज आणि फ्रेंच या सत्तांच्या चुरशीने गाजले. हा कलह या दोन देशांसाठी नविन नव्हता. त्याआधी निदान चारशे वर्ष हे दोन राज्य एका-मेकांशी सतत भांडत आली होती. त्यांच्यातील एक युध्द तर तब्बल शंभर वर्ष लढल्या गेल. (त्याल हंड्रेड इयर्स वॉर म्हणतात) पण सतराव्या शतकातल्या त्यांच्या कलहाला विशेष महत्व कारण त्याचे पडसाद अठराव्या शतकात इंग्रजांनी भारताला गुलामगिरीच्या पिंजर्‍यात यशस्वीपणे अडकविण्यात झाली.

युरोपातील रंगमंचः

सेवन इयर्स वॉरची सुरुवात, सहाजिकच, युरोप खंडात झाली.त्या काळातील युरोपिय राजकीय नकाशा आज पेक्षा वेगळा होता. इंग्लंड आणि फ्रांस, स्पेन आणि रशिया ही आजच्या काळातली राष्ट्रे तेंव्हा राजवटी होत्या तसेच हॅनोवर, प्रुशिया, ऑस्ट्रिया या इतर प्रमुख राजवटी होत्या. सन १७५६ ला प्रुशियाच्या फ्रेडरिक द ग्रेट ने ऑस्ट्रीया आणि सॅक्सोनी राज्यावर हल्ला केला. खर सांगायच तर जगातील इतर महाराज्यांच्या तुलनेत हे युध्द म्हणजे लुटपुटीचे युद्ध मानायला हवे पण लौकरच या युध्दाचे रुपांतर युरोपिय युध्दात झाले आणि पुढे जागतिक युध्दात. इंग्लंडने प्रुशियाची बाजु घेतली तर फ्रांस, रशियाने ऑस्ट्रिया आणि सॅक्सोनीची बाजु घेतली. युरोपात इंग्रजांनी आपले भूदल कधीच उतरविले नाही. युरोपीय भूमीवरची युध्दे फ्रेडरीक दि ग्रेटच्या सैन्याने जिंकलीत. इंग्रजांनी सगळे लक्ष उत्तर अमेरिकेतील धुमश्चक्रीवर केंद्रित केले.

उत्तर अमेरिकेचा रंगमंच:
कोलंबसाने दक्षिण अमेरिकेचा शोध लावल्यापासुन युरोपिय राष्ट्रांमधे तो भूखंड गिळंकृत करण्याची स्पर्धा सुरु झाली. सुरुवातीला स्पेन आणि पोर्तुगल या शर्यतीत पुढे होते. या दोन राष्ट्रांनी दक्षिण अमेरिक आणि मध्य अमेरिका वाटुन घेतले. स्पेन या जमिनी हडपण्याच्या आणि तिथल्या मूळ निवास्यांना अत्यंत भीषण रितीने मारण्यात अग्रेसर होत. त्यामुळे दक्षिण अमेरिकेतील ब्राझिल प्रांत सोडला तर इतर सर्व प्रदेश तसेच मध्य अमेरिका आणि उत्तर अमेरिकेतील फ्लॉरिडा, कॅलिफोर्निया प्रदेशावर स्पेनचे अधिपत्य होते. पण पुढे, म्हणजे १६व्या शतकात स्पेन कडे लोक कमी आणि जमिन जास्त असे झाले त्यामुळे त्यांना इतक्या मोठ्या भूभागा कडे लक्ष देणे अशक्य होते. या पार्श्वभूमीवर इंग्रज, फ्रेंच आणि डच (सध्याचे नेदरलँड) या राजवटी उत्तर अमेरिका खंडांमधे लुडबुड करु लागल्यात. लौकरच आज ज्याला आपण संयुक्त राष्ट्र अमेरिका (यु. एस.) म्हणतो त्याचा उत्तर-पूर्व भाग इंग्रजांनी घेतला तर त्याच्या उत्तरेला म्हणजे सध्याच्या कॅनडा भाग फ्रेंचांनी घेतला. अर्थात, फ्रेंच आणि इंग्रज दोघांनाही संपूर्ण उत्तर अमेरिका स्वत: साठी हव होत त्यामुळे त्यांच्या संघर्ष उत्पन्न होणे स्वाभाविक होते.

या दरम्यान उत्तर अमेरिकेत फ्रांसने कॅनडा परिसरातुन इंग्रजांच्या परिसरात हात-पाय पसरायला सुरुवात केली. सन १७५० चे दशक उजाडे तोवर इंग्रजांच्या १३ संस्थाने (कॉलनी) उत्तर अमेरिकत दृढ झाल्या होत्या. (जग प्रसिध्द हार्वड युनिवर्सिटीची स्थापना सन १६३६ ची आहे) या संस्थानांच्या द्वारे इंग्रज फ्रेंचांशी भांडू लागलेत. (अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती जॉर्ज वॉशिंग्टन यांनी युध्दाचे बाळकडू हे इंग्रजांचे सैनिक बनुन फ्रेंचांशी केलेल्या युध्दात घेतलेत) सन १७५६ ला फ्रेडरिक दि ग्रेटने युरोपात युध्द चालू केल्यावर अमेरिकेच्या सागरी किनारपट्टीवर इंग्रजी आरमार फ्रेंच आरमार आणि व्यापारी गलबतांच्या मागे लागू लागलेत. अश्या प्रकारे युरोपातील युध्दाचा दुसरा रंगमंच उत्तर अमेरिकेत उघडला. सन १७४६ (म्हणजे सेवन इयर्स वॉरच्या आधी) ला फ्रेंचांनी भारतीय उपखंडातील मद्रासचे पोर्ट इंग्रजांकडुन जिंकले त्यामुळे इंग्रज आणि फ्रेंच भारतीय उपखंडातही भांडू लागलेत. पुढे प्लासी (पळशी) च्या युध्दात इंग्रज जरी बंगालच्या नवाबाशी लढलेत तरी या नवाबाल फ्रेंचांचा पाठिंबा होता. थोडक्यात प्लासीची लढाई फ्रेंच आणि इंग्रजांमधल 'प्रॉक्सी' युध्द म्हणायला हरकत नाही. युरोप आणि उत्तर अमेरिकेतल हे युध्दाचा वन्ही आता भारतीय उपखंडात पसरु लागला.

त्या काळात इंग्रजांचे आरमार फ्रेंचांच्या तुलनेत बलाढ्य होते तर फ्रेंचांचे भूदल इंग्रजांपेक्षा अधिक शक्तिशाली होते. पण या दोन राजवटींचे खजिने फार सिमित होते. इतक्या मोठ्या समुद्री आणि भू प्रदेशात एकाच वेळेस युध्द करण्याचा ताण या दोन्ही राष्ट्रांना जड जाउ लागला. ही युध्द अजुन किती वर्ष चालाणार याची कल्पना कोणाला नव्हती पण जादूची कांडी फिरवल्या सारख तिन्ही खंडातील युध्द इंग्रजांनी जिंकलीत तसेच समुद्रावर आपली अनभिषिक्त सत्ता प्रस्थापित केली.

 तेथे त्यांच्या कडे संस्थानांच्या द्वारे भूदलही होते आणि किनारपट्ट्यांवर त्याचे आरमारही सुसज्ज होते. सेवन इयर्सच्या काळात या भागात बर्‍याच चकमकी झाल्यात आणि त्यावर फारस लिहिण्याचा मानस नाही पण या सगळ्या युध्दात इंग्रजांनी फ्रेंचांचा कडक पराभव केला. कॅनडा फ्रेंचांन सोडावे लागले. (कॅनडा जरी आज स्वंतत्र राष्ट्र असले तरी इंग्लंडची राणी त्यांची राष्ट्रप्रमुख मानल्या जाते) तसेच वेस्ट इंडिज ची बेटे आणि तिथला उभरता गुलामांचा व्यापार आणि उसाच्या साखरेचा व्यापार इंग्रजांचा झाला.

भारतात प्लासीच्या युध्दाचा अंत आणि त्याचे परिणाम सर्वश्रुतच आहेत.

सन १७६३ ला चारही मुंड्या चित झालेले फ्रेंच नरम होउन इंग्रजांसोबत करार करायला राजी झाले. त्याला करार म्हणणे विनोद ठरेल कारण उत्तर अमेरिकेचा भूभाग, वेस्ट इंडिज मधला व्यापार आणि भारतात हात-पाय पसरविण्याची शक्यता असे सगळेच्या सगळे फ्रेंचांनी गमवले. भारतात आता फक्त इंग्रज हीच एक युरोपिय सत्ता उरली होती.

युरोपिय राजवटींनी अमेरिकेत दोनशे वर्ष प्रचंड विध्वंस केला. तेथिल मूळ निवास्यांना कापून काढले किंवा जबरदस्तीने लग्न करुन त्यांची ओळख बदलवुन टाकली. पण आशिया, अफ्रिका किंवा मध्य आशिया भागात असे करणे युरोपियन सत्तांना अशक्य होते. या भागातील लोक, त्यांचा इतिहास घट्ट बसलेला होता आणि या भागातील लोकसंख्या इतकी होती की इतक्या लोकांना कापून काढणेही शक्य नव्हते. अश्या परिस्थिती व्यापाराद्वारे युरोपिय लोक आधी रुजले आणि हळु-हळु त्यांनी आशिया आणि अफ्रिका खंडांना गुलाम बनविले.

सेवन इयर्स वॉरचा अंत म्हणजे युरोपिय साम्राज्यवादाच्या वर्जन २.० ची सुरुवात मानायला हरकत नाही.
या कालमानाचा भारताचा इतिहास पश्चिमी ऐतिहासिक पुस्तकांमधे वाचायला गेलात तर पेशवाईचा उल्लेखही नसतो हे खेदजनक सत्य आहे. साधारण सन १७६३ च्या अखेरीस म्हणजे 'सेवन इयर्स वॉर' (सात वर्षाचे युद्ध) च्या अखेरीस बंगालच्या सिराजुद्दौल चा पराभव करुन इंग्रज जणु भारताचे सार्वभौम सत्ता झाल्याचा भास निर्माण केला जातो. प्लासीच्या युद्धात फ्रेंचांच्या कुबड्यांनी उभा असलेल्ल्या सिराजुद्दौला इंग्राजांनी हरवले हे खरे पण त्यातुन निष्पन्न भारत आणि पेशव्यांच्या दृष्टीने फारस काही झाले नाही. पण हे युद्ध इंग्रज आणि फ्रेंचांच्या दृष्टीने महत्त्वाचे या साठी की त्या नंतर भारतात फक्त इंग्रज हीच एक युरोपिय सत्ता उरली. इथे एक मुद्दा ध्यानात घेण्यायोग्य असा की जरी फ्रेंच आणि इंग्रजी सत्ता भारतात मामुली होत्या तरी जगात इतरत्र त्या बलाढ्य होण्याच्या मार्गावर होत्या.



(क्रमशः)
X

X


सेवन इयर्स वॉर च्या युध्दाचे क्षेत्र आणि प्रमुख स्थाने



युरोप (सन १७७०)




भारत (सन १७६०)




या युध्दाबद्दल अजुन माहितीसाठी खालील संकेतस्थळांना अवश्य भेट द्यावी:

1)http://faculty.marianopolis.edu/c.belanger/quebechistory/encyclopedia/SevenYearsWar-FrenchandIndianWar-AGreatImperialWar.htm

2) http://www.ushistory.org/declaration/related/frin.htm

3) http://stutzfamily.com/mrstutz/independence/seven.html

4) http://www.kronoskaf.com/syw/index.php?title=Political_Consequences_of_the_Seven_Years_War

5) http://history.state.gov/milestones/1750-1775/french-indian-war

1/30/14

बस ड्रायवरचा प्रजासत्ताक दिवस

माझे मामा-मामी भंडार्‍याला असतात. नागपूर हून कलकत्त्याच्या दिशेने सरळ रेषेत प्रवास केला की बरोब्बर ६४ कि.मी वर वैनगंगेच्या किनारी भंडारा लागत. काही वर्षांपूर्वी भंडारा जिल्ह्याचे विभाजन करुन गोंदिया जिल्हा नव्याने निर्माण झाला. उर्वरीत भंडारा जिल्ह्याचे केंद्रस्थान भंडारा गाव आहे. मामा-मामी कडे उन्हाळ्यात किंवा इतर वेळी (नागपूर ला सदैव उन्हाळाच असतो!) जायचे तर एस्.टी. च्या बसेस अति-उत्तम वाहन होते. दर अर्ध्या तासाने भंडार्‍याच्या दिशेने बसेस सुटतात. दीड तासात भंडारा. त्यातल्या काही बसेस चा मार्ग थोडा वेगळा असे. नागपूर जिल्ह्यातला मौदा तालुका केंद्र रस्त्यात लागत असे. काही बसेस मौद्याच्या बस्-स्टँड वर थांबत असत. '

किस्सा थोडा जुना आहे.

एकदा नागपूरला परततांना माझी बस थोडक्यात चुकली पण मौदा मार्गे जाणारी बस निघतच होती. मी धावत्या बस मधेच चढलो.

"मौदा मार्गे जाते भाऊ" ड्रायवर म्हणाला.
पुढल्या बसची वाट बघत बसण्यापेक्षा उशीर झाला तरी चालत्या बस मधे बसलेल परवडत.
"हो, चला, आज मौदा दर्शन घेउ" मी उत्तरलो.
"मौदा म्हणजे नागपूर-भंडार्‍याच्या मधल लंडन " तो हसत उत्तरला.
मला काही त्याचा विनोद कळला नाही. बस फारशी भरली नव्हती. मी ड्रायवरच्या बाजुच्या सीटवरच बसलो. रस्ता छान दिसतो आणि स्वतःची स्वतंत्र सीट मिळते
"नागपूरचे की भंडार्‍आचे?"
"नागपूर"
माझ टिकिट कंडक्टर ला दाखविणे कार्यक्रम झाला. बस भंडार्‍याच्या बाहेर एव्हाना पडली होती.
"मौद्याला थांबण जरूरी आहे का हो"
"मौदा मार्गे जाते मगाशीच तर म्हणल होत भाऊ"
"हो, ते ठिक आहे पण मौद्याला कोण उतरणार, चढणार? "
"मौद्या अर्धी बस उतरन आणि अर्धी चढन"
"बर"
"जास्त वेळ नाही लागत. हे इकडन लोक उतरले कि ते तिकडन लोक चढतात. मग सनान घेतो गाडी"
"आरामात चालवा भाऊ, एवढासा रस्ता आहे. मला काही घाई नाही"
" अस नाही भाऊ, पंधरा वर्ष झाली गाडी चालवुन, एकन-एक खडडा माहिती आहे"
"किती वेळात तुम्ही नागपूरला पोचवु शकता?"
"चाळीस मिनिट"
"मौद्याहुन?"
"नाही जी, भंडार्‍याहुन"
"शक्यच नाही
"हो जी, कारगीलच्या वेळेस पोचवली होती गाडी चाळीस मिनिटात"
"अहो, कारगील कश्मीरला आहे"
तो जोरात हसला.
"आपल्या गाडीची वेळ होती २ ची आणि आपला एक सैनिक भाऊ पाउणे-दोन ला हाजिर झाला गाडीवर. त्याची ३ची नागपूरहुन ट्रेन होती दिल्लीला. त्याला वाटल की कशीतरी मिळु शकते ट्रेन. पण आपली बस मौदा मार्गे जाणारी होती. ते कळल्यावर त्याचा जीव घायबरला. तो बस मधुन उतरून टॅक्सी मिळते का बघायला लागला. मी तसाच खाली उतरलो, त्याला बस मधे घातल आणि म्हणल की टेंशन नको. मी पोचवतो तुम्हाला. बसंती सारखी बस हाकली नागपूरच्या दिशेनी"
"मग" हे सगळ सांगतांना तो गाडी चालवतच होता. खड्डे चुकवत
" मौदा नाही आणि फौदा नाही. सनान गाडी नागपूरला. चाळीस मिनिटात नागपूर बस स्टँड. तिथुन अडीचला त्याला ऑटोत बसवल. मिळाली असणार पठ्ठ्याला गाडी"
"बसमधले मौदावाले लोक?"
"कोणी कायीच बोलल नाही. सगळे पुन्हा मौदा मार्गे भंडार्‍याच्या बस मधे बसुन परतलेत. मी तिथल्या स्टेशन सुप्रीटेंडन ना हे सांगितल तर त्या सगळ्या प्रवाशांना फ्री टिकीट मिळाल मौद्याला परतायच."
कारगिल युध्दाला तेंव्हा तीन वर्ष होउन गेली होती पण त्या ड्रायवरच्या चेहर्‍यावर समाधान लखलखत होत.
"भाऊ, कारगिल मधे गोळ्यांची बरसात होत होती. आपले कित्ती तरी जवान मेलेत. पण आपला सैनिक भाऊचा जीव त्या गोळ्यांच्या बरसतातीत भिजायला उत्सुक होता. याला म्हणायच शेर-दिल."

मी पुढे काही बोललो नाही. प्रसंग डोळ्या समोर उभा करण्याचा प्रयत्न करत होतो. घाईत असलेला सैनिक, भरधाव जाणारी एस्.टी. ची गाडी, मौद्याला जाणारी पण प्रसंगी चुप-चाप नागपूर पर्यंत प्रवास करणारे प्रवाशी. अगदी सिनेमातल्या सारख होत. पण मला काही ते दृश्य डोळ्या समोर उभ करता येइना. ना मी सैनिक होतो, ना मला बस चालवता येते आणि ना ही मी मौद्याला रहातो.

नागपूर आल. मी बस स्टँड वरुन घराच्या दिशेने चालू लागलो. ड्रायवरचा शेवटल वाक्य माझ्या मनात कुठेतरी घर करुन बसल. तो सैनिक युध्दानंतर परतला का हेसुध्दा विचारयच भान राहिल नाही. एखाद वेळेस त्या ड्रायवरलाही माहिती नसेल.

दर प्रजासत्तक दिनाला किंवा स्वातंत्र्य दिनाला मला ही गोष्ट आठवते. या प्रसंगाला इतकी वर्ष झालीत की ड्रायवरने सांगितलेल्या या किस्स्यात खर किती आणि मन-घडन किती, याचीही शंका येते. तस म्हणल तर या प्रसंगात काहीच विशेष नाही पण थोड सखोल निरिक्षण केल तर आपल्या समाजाचे अनेक रंग झळाळातात. तो सैनिक, तो ड्रायवर, ते प्रवाशी आणि फुकटात परतीची टिकीट देणार सुप्रीटेंडट, हे सगळे समाजाच्या विविध स्तरातील आणि आयुष्यात वेगवेगळा प्रवास करणारे घटक आहेत. पण आपल्यामुळे एका सैनिकाची ट्रेन सुटायला नको किंवा त्याला ट्रेनवर वेळेवेळेवर पोचायालच हव या साठी सगळे आपापल्या परीने झटलेत. कळत-नकळत प्रत्येकाने आपले खारीचे योगदान दिले. असे असंख्य किस्से, घटना आणि प्रसंग आपल्या देशात सतत घडत असणार. फक्त आपल्याला त्याची कल्पना नसते. असे प्रंसग घडतात म्हणुनच गेल्या सात दशकात आपल्या देशाने एवढी प्रगती केली. करोडो लोकांना गरिबीतून वर काढले आणि सुशिक्षित केल. अन्न धान्याच पर्वतकाय उत्पादन करण्याची क्षमता निर्माण केली. देशाच्या रक्षणार्थ नौदल, वायुदल आणि भूदलाचे अभेद्य कवच तयार केल. आकाशात उपग्रह पाठवलेत आणि नुकतच मंगळावर यान पाठवले.

अजुन अनेक गोष्टी साध्य होणे आहे आणि त्यासाठी भरपूर कष्ट उपसावे लागणार आहेत पण ड्रायवरचा हा किस्सा आठवला की अशक्यातल शक्य होणार याची खात्री पटते.

खड्डे चुकवित गाडी सनान जाणार याची खात्री वाटते.