10/24/13

ता.क. - पेशवाईचा र्‍हास - दुष्काळ, इंग्रज-फ्रेंच युध्द आणि अजुन बरेच

या लेख-मालेतील पुढला लेख प्रकाशित करायला थोडा अवकाश आहे. थोडे वाचन अजुन बाकी आहे आणि तसेच सध्या बाड-बिस्तर बांधणे चालू आहे. पुढल्या महिन्यात सहकुटुंब स्वदेशात परतण्याचा मानस आहे त्यामुळे बरीच धावपळ होतेय. पण माझ्या मागच्या लेखातील एका मुद्द्यावर अधिक स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे असे लक्षात आले.

मागल्या लेखातील तीन मुद्द्यांपैकी एक मुख्य मुद्दा असा की भारतावर अरबी-तुर्क-मध्य आशियातुन होणारी आक्रमणे पेशवाईच्या उदया पर्यंत संपूर्णपणे थांबली होती. पण पेशवाईची धाव, ध्येय आणि उठाठेव ही दिल्ली जिंकुन भारतावर राज्य करण्याची होती. दिल्ली ही भारताची राजधानी आणि मानबिंदु हे जरी खरे असले तरी परकीय आक्रमक आणि आक्रमणांच्या पध्दती यात प्रचंड बदल या काळात झाला. मध्य आशियातील मुसलमानी टोळ्यांऐवजी आता आक्रमक गोर्‍या कातडीचे आणि युरोपिय होते आणि घोडदळ आणि प्रचंड मोठाल्या तोफांच्या आधारा ऐवजी गलबते आणि समुद्री तोफांच्या आधारावर नविन आक्रमणे होणार होती. तसेच तंत्रज्ञान युरोपातील औद्योगिकीकरणामुळे एक नविनच पातळी गाठणार होत. भारत आणि पेशवाई या नविन आक्रमक आणि आक्रमणांसाठी मुळीच तयार नव्हता.

मागील लेखात मी मोघलांना सगळ्यात जास्त भिती आणि वचक तुर्की आणि साफाविद साम्राज्यांचा होत असे म्हणले आणि पुढे मी तुर्की साम्राज्याच्या बलाढ्य असल्याचेही बोललो. पण मला या विचारात/वक्तव्यात थोडा बदल करणे आवश्यक वाटते. मोघलाईच्या अंतापर्यंत तुर्की साम्राज्य बलाढ्य राहिले नव्हते. त्यांच्या 'सुर्वणकाळ' सुलेमान दि मॅग्निफिसंट च्या राजवटी नंतर म्हणजे सन १५९० च्या दरम्यान होता. (सुलेमान दि मॅग्निफिसंटचा मृत्यु सन १५६६ ला झाला) त्या नंतरचा काळात तुर्की साम्राज्य प्रसरण पावणे बंद झाले होते. त्यांच्या फौजा, युध्दशैली आणि आरमार बलाढ्य असले तरी त्यांचे राजे (सुल्तान) अत्यंत साधारण होते. त्यामुळे त्यांच्यावर आक्रमण करुन कोणाल जिंकणे अशक्य असले तरी त्यांनी इतरांवर आक्रमण करुन जिंकणेही कठिण होत गेले. तसेच तुर्की साम्राज्याचे लक्ष सदैव पूर्व युरोपावर होते. लपांटोच्या समुद्री युध्दातल्या (सन १५६६) पराभवा नंतर तुर्कीच्या वजीराचा मानस पुढली स्वारी भारतावर करण्याचा होता तसेच पुढे (१६व्या शतकात) अरबी समुद्रातील पोर्तुगिज चाचेगिरीला आळा घालायला तुर्की आरमार अरबी समुद्रात उतरवण्याची तयारीही तुर्कांनी केली होती पण य दोन्ही मनसुब्यांची परिणिती भारत आणि पर्शियात काही काळासाठी भीतीचे वातावरण पसरविण्या पलिकडे काही झाली नाही.

लपांटो हे मेडिटेरिनियन समुद्रातील एक बेट आणि तिथल्या समुद्रात झालेल्या तुर्की आणि युरोपिय साम्राज्यातील युद्धाचे स्थान. त्या काळात तुर्की साम्राज्याची सत्ता अजिंक्य होती आणि लौकरच संपूर्ण युरोप ते जिंकणार अशी चिन्ह स्पष्ट होती. त्यांचे आरमारही बलाढ्य होते. युरोपिय सत्ता (प्रामुख्याने स्पेन), पोप आणि इतर जमिनदारांनी पैसा, सैन्य आणि नाव्हा एकत्र करुन लपांटो जवळ तुर्की आरमाराला कडाक्याची टक्कर दिली. आणि आश्चर्य म्हणजे युरोपिय आरमार विजयी ठरल. हा विजय म्हणजे युरोपिय सत्तांना तुर्की साम्राज्याचा काही भूभाग जिंकला अस नव्हे पण एक, तुर्की साम्राज्याच्या मानाला हा पराजय म्हणजे काळिमा ठरला आणि दुसर, समुद्राद्वारे इटली, स्पेन इत्यादी युरोपिया राष्ट्रांना जिंकण्याच्या तुर्की अभिलाषेला आळा बसला. या युध्दानंतर मेडिटेरेनियन समुद्राचा वापर करणे युरोपियन राष्ट्रांना सोपे झाले आणि तुर्की साम्राज्याचे भय कमी झाल्यामुळे स्पेन आणि पोर्तुगल ने त्यांचे लक्ष नविन शोध लागलेल्या दक्षिण अमेरिकेकडे वळवले.

लपांटोच्या युध्दाचा वरवर बघता भारताशी काही संबंध नाही. त्या काळात अकबरी राजवट दृढ होत होती आणि शिवाजी राजांच्या जन्माला अजुन पन्नास वर्ष बाकी होती. पण सागरी युध्दातील या विजयामुळे युरोपिय राष्ट्रांमधे एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला. युरोपिय गलबते हळु हळु जगभर पसरु लागल्यात आणि अवघ्या दोनशे वर्षात तीन खंडांमधे एकाच वेळेस तीन वेगवेगळी युध्द करण्याची क्षमता त्या राष्ट्रांमधे निर्माण झाली.

लपांटोच्या युद्धावर मी आधी एक ब्लॉग लिहिला होता. त्याचा दुवा हा आहे:  http://marathimauli.blogspot.com/2010/04/blog-post.html
---
Sources:
1) Empires of the Sea: The Siege of Malta, the Battle of Lepanto, and the Contest for the Center of the World by Roger Crowley

2) After Tamerlane by John Darwin

3) Empires of the Monsoon: A History of the Indian Ocean and Its Invaders by Richard Hall

10/18/13

गंगा स्तोत्र - आद्य शंकराचार्य

आदी शंकराचार्यांच्या रचना केवळ अर्थपूर्णच नव्हे तर गेय ही असतात. सुमधुर आणि रसाळ संस्कृत मधे लिहिलेल्या या रचनांपैकी मी माझ्या आवडत्या काही रचना वाचकांसमोर ठेवतो आहे.

गंगा स्तोत्र
        - आद्य शंकराचार्य 

देवि! सुरेश्वरि! भगवति! गङ्गे त्रिभुवनतारिणि तरलतरङ्गे ।
शङ्करमौलिविहारिणि विमले मम मतिरास्तां तव पदकमले ॥ 1 ॥
भागीरथिसुखदायिनि मातस्तव जलमहिमा निगमे ख्यातः ।
नाहं जाने तव महिमानं पाहि कृपामयि मामज्ञानम् ॥ 2 ॥
हरिपदपाद्यतरङ्गिणि गङ्गे हिमविधुमुक्ताधवलतरङ्गे ।
दूरीकुरु मम दुष्कृतिभारं कुरु कृपया भवसागरपारम् ॥ 3 ॥
तव जलममलं येन निपीतं परमपदं खलु तेन गृहीतम् ।
मातर्गङ्गे त्वयि यो भक्तः किल तं द्रष्टुं न यमः शक्तः ॥ 4 ॥
पतितोद्धारिणि जाह्नवि गङ्गे खण्डित गिरिवरमण्डित भङ्गे ।
भीष्मजननि हे मुनिवरकन्ये पतितनिवारिणि त्रिभुवन धन्ये ॥ 5 ॥
कल्पलतामिव फलदां लोके प्रणमति यस्त्वां न पतति शोके ।
पारावारविहारिणि गङ्गे विमुखयुवति कृततरलापाङ्गे ॥ 6 ॥
तव चेन्मातः स्रोतः स्नातः पुनरपि जठरे सोपि न जातः ।
नरकनिवारिणि जाह्नवि गङ्गे कलुषविनाशिनि महिमोत्तुङ्गे ॥ 7 ॥
पुनरसदङ्गे पुण्यतरङ्गे जय जय जाह्नवि करुणापाङ्गे ।
इन्द्रमुकुटमणिराजितचरणे सुखदे शुभदे भृत्यशरण्ये ॥ 8 ॥
रोगं शोकं तापं पापं हर मे भगवति कुमतिकलापम् ।
त्रिभुवनसारे वसुधाहारे त्वमसि गतिर्मम खलु संसारे ॥ 9 ॥
अलकानन्दे परमानन्दे कुरु करुणामयि कातरवन्द्ये ।
तव तटनिकटे यस्य निवासः खलु वैकुण्ठे तस्य निवासः ॥ 10 ॥
वरमिह नीरे कमठो मीनः किं वा तीरे शरटः क्षीणः ।
अथवाश्वपचो मलिनो दीनस्तव न हि दूरे नृपतिकुलीनः ॥ 11 ॥
भो भुवनेश्वरि पुण्ये धन्ये देवि द्रवमयि मुनिवरकन्ये ।
गङ्गास्तवमिमममलं नित्यं पठति नरो यः स जयति सत्यम् ॥ 12 ॥
येषां हृदये गङ्गा भक्तिस्तेषां भवति सदा सुखमुक्तिः ।
मधुराकन्ता पञ्झटिकाभिः परमानन्दकलितललिताभिः ॥ 13 ॥
गङ्गास्तोत्रमिदं भवसारं वांछितफलदं विमलं सारम् ।
शङ्करसेवक शङ्कर रचितं पठति सुखीः तव इति च समाप्तः ॥ 14 ॥


10/5/13

पेशवाईचा र्‍हास - दुष्काळ, इंग्रज-फ्रेंच युध्द आणि अजुन बरेच (भाग १)

पेशवाईवर लेखमालिका लिहायची इच्छा किंवा प्रयत्न आणि त्यान्वये होणारा थोडा बहुत अभ्यास कुठल्या विशिष्ट दिशेने होत नाही. पुढल्या लेखात मी थोरल्या बाजीरावांबद्दल लिहिन अस ठरवुन मला लिहिता येत नाही. कधी काही प्रश्न मनात येतात त्यासाठी उत्तरांचा मागोवा घेतल्या जातो. कधी काही वाचनात येत त्याने नविन दृष्टीकोनांची अचानक उत्पत्ती होते आणि मग त्याला अभ्यासाचा पाठिंबा हवा म्हणुन त्या दिशेने वाचन होत. तर कधी जुनी पुस्तके, लेख नव्या प्रकाशात वाचल्या जातात. पण हा सगळा अभ्यास इंटरनेटमुळे बर्‍या पैकी शक्य असला तरी मराठी इतिहास समजुन घेण्यासाठी आवश्यक आणि महत्त्वाची पुस्तके मला उपलब्ध नाही. एकुण हे लेख वर्-वरचे आहेत अशी शंका मला येते. असो.

गेले काही दिवस तीन महत्त्वाचे मुद्दे माझ्या डोक्यात घोळतायत. पहिला मुद्दा - सन १८०० च्या आसपास भारतात पडलेले दुष्काळ. आमचे मित्र श्री अंबरीश यांच्याशी झालेल्या संवादात मला पहिल्यांदा लक्षात आला. या लेखाच्या शेवटी अधिक माहिती असलेल्या संकेतस्थळांची यादी दिली आहे. दुसरा मुद्दा सन १७९५ ते सन १८०० च्या दरम्यान मराठा साम्राज्याच्या धुरंधर नेत्यांच्या एका पाठोपाठ झालेले मृत्यु. आणि तिसरा मुद्दा म्हणजे सन १७५० ते सन १८०० च्या साधारण पाच दशकातली जागतिक परिस्थिती.

नशिबावर विश्वास ठेवा कि नका ठेउ, नशिबाचे ठसे ऐतिहासिक घटनांवर प्रखरतेने जाणवतात. नशिब म्हणजे नक्की काय? शिवाजी महाराजांचा पन्नासाव्या वर्षी मृत्यु तर औरगंझेबाने नव्वदी गाठणे ही नशिबाने मांडलेला क्रूर खेळ होता. अर्थात त्या घटना घडत असतांना हा नशिबाचा खेळ आहे असे लक्षात येणे कठीण असते. नशिबाचा असाच एक फटका असा सन सन १७९० ते सन १८०१० च्या दरम्यान भारतभर पडलेले दुष्काळ. गुजराथ-भुज प्रदेशापासुन ते बंगाल पर्यंत, मद्रास पासुन ते राजस्थान पर्यंत सगळा प्रदेश दुष्काळाच्या तडाख्यात एका पाठोपाठ सापडला. अर्थात पेशवाईमुळे दुष्काळ पडला नाही अस नाही. देशाच नशिब वाईट एवढच. पण या दुष्काळांनी मराठा पातशाहीची कंबर अजुन वाकली यात काही शंका नाही. आधी एक-दोन उदाहरण थोडक्यात विचारात घेउया. संत तुकाराम महाराजांच्या काळात दोन दुष्काळ एका पाठोपाठ आलेत. यातला सन १६३०-३२ चा दुष्काळ अत्यंत भीषण होता. (त्यात त्यांची पहिली बायको आणि मुलगा गेलेत) या दुष्काळात गावच्या गाव भुकेल्या पोटी मरुन गेलीत. आणि त्यात काही कमी असेल तर त्या काळात मुसलमानी पातशाह्यांच्या युध्दांचा उत आला होता. अश्या परिस्थितीत रंजली-गांजलेली लोक शिवाजी राजांच्या मागे उभी रहायला पटकन झाली असतीलही. इंग्रजांच्या राजवटीत भरपूर दुष्काळ पडलेत आणि यात इंग्रज राजवटीचा फार मोठा हात होता पण असल्या परिस्थितीतही सन १९४२-४३ चा बंगालचा दुष्काळ ह्रदय पिळवटुन टाकणारा होता. लाखो लोक इंग्रजांच्या चोरपणा मुळे हकनाक बळी गेलेत. अन्नाच्या अभावी खंगुन-झिजुन स्वतःची हाड मोजत मेलेत. भारतीय असंतोषाला हा शेवटचा धक्का म्हणायला हरकत नाही. चार-पाच वर्षातच भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले. पेशवाईच्या अंती घडलेले दुष्काळच केवळ पेशवाईच्या र्‍हासाला कारणीभूत नव्हते. पण करवसुली बंद पडणे, गाव ओसाड पडुन समाज व्यवस्था विस्कळीत होणे, लोक उपाशी मरण्याने काम करायला कमी हात आणि लढायलाही कमी हात इत्यादी अनेक कारणे पेशवाई राजवटीला डसली असणार. पेशवाई विरुद्ध उठाव जरी झाला नसला तरी या दुष्काळांचा विपरीत परिणाम नक्कीच झाले असणार.

दुष्काळा सारखाच अजुन एक फटका म्हणजे मराठा साम्राज्याच्या कर्तबगार पिढीचा मृत्यु. छत्रपती संभाजींच्या मृत्यु (सन १६८९) नंतर मराठा साम्राज्यावर कोणा एका नेत्याच किंवा राजाच संपूर्ण प्रभुत्व कधीच नव्ह्ते. अगदी थोरल्या बाजीरावांच्या काळातही नागपूरचे भोसले आणि गुजरातेचे दाभाडे स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करु बघत होते. थोडक्यात पुढारी आणि लढवय्यांची कमतरता नव्हती. पानिपतच्या युध्दात एक कर्तबगार पिढी मारल्या गेली. विश्वासराव, सदाशिवराव भाऊ आणि पाठोपाठ नाना साहेब गेलेत. तसेच युध्द भूमीवर भावी पिढीही गेली. पण मराठी समाजाने एक नविन कर्तबगार पिढी पुन्हा उभी केली. अत्यंत कम नशिबी आणि अल्पायुषी पण अतिशय कर्तबगार सवाई माधवरावां पासून ते नाना फडणविस, अहिल्याबाई, यशवंतराव होळकर आणि महादजी शिंद्यांनी मराठा साम्राज्याची घडी पुन्हा बसवली. महादजी शिंदे यांनी उत्तर भारतात परत मराठ्यांचा जरब बसवला. तसेच बंदुका आणि तोफांचा लष्करी डावपेचात वापर करण्यासाठी फ्रेंचांचे सहाय्य घेउन बदलत्या युध्द शैलीसाठी पावले उचललीत.अहिल्याबाईंनी लोकसेवा आणि उत्तम प्रशासना द्वारे हिंदु धर्माची सेवा आणि लोकांमधे मराठा शासना बद्दल पुन्हा आदर निर्माण केला. नाना फडणविसांनी मुत्सद्देगिरीच्या गोष्टी प्रसिध्द आहेतच पण आज जे मॅनेजमेंट म्हणतो तश्याच पध्दती नानांनी अवलंबिल्या. यशवंतराव होळकर हे थोरल्या बाजीरावांच्या पठडीतले शेवटले वंशज मानायला हवेत. धर्मनिष्ठ, शूर आणि दूरद्रष्टा असा हा सरदार काही वर्ष आधी मराठ्यांना लाभायला हवा होता. हे सगळे सेनानी, राज्यकर्ते आणि व्यवस्थापक आपापल्या परीने, कष्टाने राज्यवर्धन आणि राज्य संगोपन करीत असतांना नशिबाने विचित्र फास टाअकला. पानिपत युध्दा एवढच नुकसान सन १७९४ ते सन १८०० च्या काळात पुन्हा झाल. महादजी शिंदे, अहिल्याबाई होळकर आणि नाना फडणविस यांना या सहा वर्षाच्या कालावधीतच देवाज्ञा झाली. आणि दहा वर्षातच यशवंतराव होळकरांचाही मृत्यु सन १८११ ला झाला. एवढे स्तंभ एका पाठोपाठ कोसळलेत तर सन १८१८ ला मराठा साम्राज्य लयास गेले हे काही नवल नव्हे.

याच्या अगदी विरुद्ध दिशेने इंग्रजी सत्तेने प्रवास केला. या वीस-पंचवीस वर्षांच्या कालावधीत इंग्रजी सत्ता झपाट्याने बोकाळत गेली. इंग्रजांच्या हातून अमेरिका खंड सुटला होता त्यामुळे त्यांनी सगळे लक्ष भारतावर केंद्रित केले. सेवन इयर्स वॉर मधे विजय प्राप्त करुन इंग्रजां मधे एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला होता. तसेच औद्योगिकीकरणाचे वारे तेंव्हाच वाहु लागले होते. आणि माझ्या मते सगळ्यात मुख्य म्हणजे बाष्पचलीत बोटींच्या तंत्रज्ञानाचा इंग्लंड मधे झालेल्या विकासामुळे इंग्रजांनी समुद्री दळण वळणावर आणि नौदलावर संपूर्ण प्रभुत्व प्रस्थापित केले.

इंग्रजी सत्तेचे औद्योगिकीकरण, त्यांच्या नौदलाचा विकास इत्यादी घटना नशिबाचा खेळ आहे असे माझे म्हणणे मुळीच नाही पण या घटना घडत असतांना मराठी साम्राज्याच्या पुढार्‍यांचा आणि सेना नायकांचा तेंव्हाच आणि एकत्रच मृत्यु होणे ही नशिबाची खेळी असे मला वाटते.

या अनुषंगाने आपण शेवटल्या आणि सगळ्यात मुख्य मुद्द्या कडे वळुया. सन १७५० नंतरच्या कालावधीचा विचार केला तर प्रामुख्याने दोन गोष्टी ठळकपणे दिसतील. पहिली म्हणजे सतराव्या शतकातल्या शंभर वर्षात झपाट्याने नाहीशी झालेली मध्य आशियातुन होणारी तुर्की-मुसलमानी आक्रमणे. दुसर म्हणजे इंग्रज-फ्रेंचांची युध्द - प्रामुख्याने सात वर्षाचे युध्द. (याल सेवन इयर्स वॉर म्हणतात)



आता मध्य आशियातून आक्रमणे थांबलीत म्हणजे काय? आणि ती आक्रमणे थांबलीत तर सन १७६१ च पानीपत काय होत? हे प्रश्न पडण सहाजिक आहे. या मुद्द्याचे अवलोकन करतांना इतिहासाच थोड मागे जाणे आवश्यक आहे.

मुसलमानी आक्रमणे भारतावर जरी सातव्या शतकापासून होत असली तरी सन ११४३ च्या पृथ्वीराजाच्या तराईच्या पराभवानंतर या आक्रमणांचा बांध खराखुरा फुटला. त्यांनंतर मोघलांच्या उदया पर्यंतर भारतीय उपखंडावर या आक्रमणांच्या सुनामी सतत तुटुन पडत होत्या. ही आक्रमणे अफगाणिस्तान-सिंध-पंजाब मार्गे दिल्लीत धडकत असे. हळुहळु करत या आक्रमकांनी विंध्य ओलांडला आणि रामेश्वरम पर्यंत धडक मारली आणि ठिकठिकाणे मुसलमानी शाह्य स्थापन केला. या आक्रमणांमागे लुटपाट हे महत्त्वाचे कारण असले तरी भारत पादाक्रांत करुन मुसलमान करण्याची अभिलाषा हे सगळे आक्रमक बाळगुन होते. बाबरने दिल्ली जिंकल्यावर आणि अकबराने मोघली सत्तेची पाळमुळं खोल रोवल्यावर हि आक्रमणे थांबली (अर्थात हे मोघल स्वतः आक्रमकच होते!) पण या आक्रमणांची भीती सदैव मोघली सुल्तानांना असे. उदाहरणार्थ, शिवाजींना आग्र्याला कैदेत मारण्या ऐवजी काबुल भागात सतत होणार्‍या चढाया लढायला पाठवायचे होते. पुढे नेताजी पालकर हातात लागल्यावर औरंगझेबाने त्याला काबुललाच पाठवले. मोघलांना नुसत्या मध्य आशियातल्या टोळ्यांचे भय नव्हते. या व्यतिरिक्त इराणी साफाविद आणि त्या काळातल्या सगळ्यात बलाढ्य अश्या तुर्की साम्राज्याचाही फार वचक होता. तुर्की साम्राज्य त्या काळात खरोखरच बलशाली होते. त्यांच्याकडे बलाढ्य सेना होत्या आणि अद्यावत नौदलही होते. त्यांचे सुल्तान स्वतः फार शूर होते. त्यांचे साम्राज्य इजिप्त ते इराण आणि तसेच, पूर्व युरोपातही पसरले होते. या तूर्की सुल्तानांनी स्वतः ला मुसलमानांचा खलिफा मानायला सुरु केले आणि त्यांच्या सेना युरोपच्या विएन्ना पर्यंत धडक मारीत होत्या. अर्थात या साम्राज्याला भारताची तहान लागणे स्वाभाविक होते. पण युरोप पादाक्रांत करण्याच्या अभिलाषेमुळे त्यांना भारताकडे फारसे लक्ष देता आले नाही. तुर्की आणि साफाविद वगळलेत तर मध्य आशिया किंवा अरबस्थानात अजुन कुठली मुसलमानी सत्त उरली नव्हती. या सत्तां शिवाय भारतावर आक्रमण करुन जिंकण्याची शक्ती कोणातही उरली नव्हती.

थोरल्या बाजीरावांनी दिल्ली गाठे पर्यंत मोघली सत्ता खिळखिळी झाली होती. त्यामुळे अफगाणीस्तानातल्या आक्रमकांनी पुन्हा भारतावर डोळे रोखले. पण केवळ दिल्ली पूर्तीच ती नजर सिमित होती. ते पण स्वत;ला दिल्लीच बादशाह बनवायला नव्हे तर दिल्लीचा जो कोणी बादशहा असेल त्याच्या कडून कर वसुल करायला मिळावा एवढेच. नादिर शहा आणि पुढे अहमदशहा अब्दालीची आक्रमणे एवढ्यापूर्तीच सिमित होती. उत्तरेत मराठा सरदारांनी आपापसातल्या भांडणात पंजाब-सिंध भागात भक्कम शासन निर्माण केले नाही त्यामुळे हा भाग एकदा जिंकुनही सन १७६० ला अहमदशहा अब्दाली सर्रास दिल्ली पर्यंत पोचला. अगदी पानिपताचे युद्ध जिंकुनही अब्दाली मागेच परतला. अब्दाली नंतर भारतावरची परकीय मुसलमानी आक्रमणे खर्‍या अर्थाने थांबली होती. पण मराठी सत्ताधीशांचा रोख अजुनही उत्तर भारत, दिल्ली, या दिशेने होता आणि समुद्राकडे त्यांनी संपूर्ण दूर्लक्ष केले. अब्दाली ला छातीवर झेलुन परकीत आक्रमणे मराट्यांनी थांबवली खरी, पण पुढले शतक नौदलाच्या अनुषंगाने लढल्या जाणार होते, समुद्र हा आत नविन 'मध्य आशिया' ठरणार होता आणि समुद्राला अंकित करणारेच नविन सत्ताधीश बनणारे होते या बदलत्या वार्‍याचा गंध मराठी सेना नायकांना मूळीच आला नाही.

आपण कालमानात थोडे पुढे जातोय. परत जर का सन १७५० च्या आस पास उभे राहिलोत तर केवळ नौदलावर भारत जिंकणे इंग्रजांना शक्य नव्हते. त्या काळात भारतात इंग्रजांचा थोडा-बहुत वावर होता आणि त्यांचे जगात इतरत्र जो पसारा होता त्याचा विचार करता इंग्रजांना मराठी साम्राज्याशी टक्कर देणे अशक्य होते.

पण मग इंग्रज-फ्रेंचांमधे सात वर्षाचे युध्द झाले. जगात तिन खंडावर लढल्या गेलेले हे चुरशीच्या युध्दाचे पडसाद भारतावर लौकरच दिसुन आलेत.


(क्रमशः) 

------

दुष्काळावर अधिक माहिती/अभ्यासासाठी दुवे

1) "An Explanatory note on the famines in India" ( http://jambudveep.wordpress.com/2011/01/08/an-explanatory-note-on-the-famines-in-india/ )

2) Indian Famines: Their causes and Remedies by Prithiws Chandra Ray. Puslished January 1, 1901

3) The End of Hunger by David Riff ( http://www.newrepublic.com/article/world/the-end-hunger)

4) On Famine Crimes and Tragidies by Alex de Waal (http://www.thelancet.com/journals/lancet/article/PIIS0140-6736(08)61641-4/fulltext)