9/7/13

ता.क. - परदेशातील स्वातंत्र्यदिनी झालेले अंतर्मुख मन

मागच्या लेखाच्या निमित्ताने एक अनुभव सांगावासा वाट. मी कॉलेज मधे असतांना कॉलेजच्या ग्रंथालयात काम करीत असे. तिथे माझ्या सोबत एक 'डेव' म्हणुन माझ्या सारखाच विद्यार्थी काम करत असे. तो दिसायला भारतीय दिसत असे पण बाकी रहाणीमाना वरुन तो कुठल्याच दृष्टीने भारतीय नव्हता. एक दिवस त्याच्या गळ्यात मला हनुमानाचे ताईत दिसले. मला आश्चर्य वाटले. आता अमेरिकेत हिंदु धर्म स्विकारलेले बरेचसे लोक आहेत. त्यापैकी तर हा एक नाही असा मला प्रश्न पडला. दुसर्‍या दिवशी मी त्याला विचारले तर मला आश्चर्याचे अजुन धक्के बसले. त्याचे नाव डेव होते पण खरे नाव देवेंद्र साव्हने होते. त्याचे कुटुंब मूळ वेस्ट इंडिज चे आणि त्या आधि मूळ भारतीयच. डेव ला भारताच मूळीच गंध नाही तसेच सणावारांचाही त्याला फारसा गंध नव्हता. त्याच्यावर वेस्ट-इंडिज आणि अमेरिकेचे संमिश्र संस्कार झालेले होते. थोडक्यात संस्कार आणि इतिहासाच्या बाबतीत तो गोंधळलेला होता. पण त्याच्या वडिलांची हनुमानावर भक्ती होती आणि त्यांनीच त्याला हनुमानाचे ताईत घालायला दिले. तो मला म्हणाला की ते ताईत तो कधीच काढत नाही आणि त्याच्या मुला-बाळांनाही तसलच ताईत पुढे देणार.  

9/4/13

परदेशातील स्वातंत्र्यदिनी झालेले अंतर्मुख मन

आदल्या दिवशी फोन आला की चिन्मय, उद्या स्वातंत्र्यदिवस उत्सवात मदत हवी आहे, येतोस का? मी विचार केला की जाउया. काही तरी बदल आणि गंमत. मिरवणुकीत एका कार वर गणपतीची मूर्ती चढवली होती आणि मिरवणुकीच्या आघाडीवर मला ती कार चालवण्याची कामगिरी होती. थोडक्यात परदेशात होण्यार्‍या या उत्सवाच्या गणपतीचा मी उंदीर! भारता पासून हजारो मैल दूर भारत स्वांतत्र्य दिवस दिमाखाने साजरी होत होता. गणपतीच्या मूर्तीला समोर ठेउन लोक ढोल-ताशे वाजवत, नाचत, मिठाई खात आनंदाने वंदे मातरम् चा जल्लोष करीत होते. सगळ दृश्य थोड विस्मयकारक होते. मिरवणुकीत सामील झालेल्यांपैकी बहुतांश जन अमेरिकन नागरीक होती आणि जी लोक नव्हती ती नागरीकत्व प्राप्त करण्यासाठी रांगेत उभी होती. थोडक्यात, या पैकी कोणीचीहे कधीही भारतात परतण्याची इच्छा ठेउन नव्हत. मिरवणुक मुंगीच्या गतीने सरकत होती आणि माझ्या डोक्यात विचारांची चक्र भरधाव फिरू लागलीत. भारतातून तडफडत निघुन परदेशी आल्यावरही ही लोक उत्साहाने स्वातंत्र्य दिवस का साजरी करतात? भारताचा दु:स्वास म्हणुन हि लोक पळालेली नाहीत हे मान्य. पण स्वातंत्र्य दिवस साजरी करण्या मागचा हेतु तरी काय?

सन १९४७ ला इंग्रजांच्या मगरमिठीतून भारत कसाबसा सुटला तेंव्हा जगात भारत आणि भारतीयांना स्थान दुय्यम होते. पुढील साठ वर्षात हे चित्र झपाट्याने बदलले. मनमोहन सिंग सारख्या तत्सम घृणास्पद नेत्यांच्या अथक मूर्खपणा, शंढपणा आणि भ्रष्टपणाचा गेले साठ वर्ष सामना करत देशाने भरपूर प्रगती केली. परदेशस्थ भारतीयांनी मात्र प्रगतीचे आणि भरभराटीचे नविन विश्व निर्माण केले. केवळ तंत्रज्ञानच नव्हे तर वैद्यकीय आणि व्यापार क्षेत्रातही भारतीयांनी यशाच्या उत्तुंग शिखरे गाठलीत आणि रग्गड पैसा कमविला. पाच-सात वर्षांपूर्वी एका विख्यात कंपनीच्या अनुमते परदेशी भारतीयांकडे तीनशी बिलियन डॉलर्स हुन अधिक संपत्ती आहे. आज अमेरिकेत भारतीय सगळ्यात श्रीमंत समुदाय आहे. आणि हे यश स्वातंत्र्योत्सव थाटात साजरी करुण्यात ठळक पणे दिसुन येत.
गेल्या दोन दशकात अमेरिकेत जाण्याचे प्रमाण अधिक असले तरी इंग्रजांची सत्ता सुरु झाल्यापासुन भारतीय बर्‍याच देशांमधे पसरले आहेत. वेगवेगळ्या देशात वसलेल्या भारतीयांचा इतिहास आणि अनुभवांवर एका लेखात लिहिणे अशक्य आणि अनुचित ठरेल. पण अमेरिकेतल्या असो कि इंग्लंडमधल्या, ऑस्ट्रेलिया असो की वेस्ट-इंडिज, एक साधारण गोष्ट अशी की भारत सोडूनच ही लोक यशस्वी ठरलीत किंवा यशाच्या आणि पैश्याच्या शोधातच या भारतीयांनी मेहनत करुन भारत सोडला. पण भारताबाहेर राहुनही ही लोक देशभक्त आणि देशप्रेमी राहिलीत ही आश्चर्याची गोष्ट आहे. विशेषतः अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयां बद्दल असे म्हणायला हरकत नाही.

या देशभक्तीचे बाराकाईने निरिक्षण केले तर त्यातील घड्या हळु हळु उलगडायला लागतात. असे ध्यानात येत की भारतातून नुकतीच आलेली लोक सुरुवातीला देशभक्त असतात आणि कालांतराने त्याचे रुपांतर भारत समाज भक्तीत होते. कारण भारतीय समाज आणि भारत देश या नाण्याच्या दोन बाजू नसुन दोन वेगळी नाणी आहेत हे लक्षात घ्यायला हवे. पण भारत देश हा भारतीय समाजापेक्षा वेगळा कसा? आपण इथे दोन उदाहरणांचा विचारात घेऊ. वेस्ट इंडिज मधे दिडशे वर्षांपूर्वी स्थलांतर केलेला भारतीय आणि गेल्या पंचवीस वर्षात मोठ्या संख्येने अमेरिकेत (संयुक्त राज्य अमेरिका) स्थायिक झालेला भारतीय यांना आपण उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या पायर्‍यांवर बघु शकतो. एक भारतीया भारतापासुन दिडशे वर्षांहुन अधिक तुटलेला आण तरीही भारतीय समाजाल घट्ट धरुन ठेवण्यात धडपड करणारा तर दुसरा भारतीय केवळ पंचवीस वर्ष परदेशस्थ असल्यामुळे अजुन भारताशी नाळ टिकवुन ठेवलेला. माझ म्हणण हे की हा अमेरिकेतला भारतीयाची आज-उद्यात ही नाळ तुटणारच आणि तो नविन स्वरूप धारण करणार.

भारतीय समाज अत्यंत पुरातन आणि सनातन आहे. (अस म्हणल्या बरोब्बर 'सर्व-धर्म-समभावी झोलेवाले' हिंदुत्ववादी, हिंदुत्ववादी चा आरोप लावतील. पण त्या शंख लोकांना सध्या अडगळीत रवाना करुया.) भारतीय उपखंडात जन्मलेल्या या संस्कृतीचा विस्तार पाकिस्तान पासुन ते म्यानमार पर्यंत मानायला हरकत नाही. हा समाज परकीय आक्रमणे आणि आंतरिक बदलाच्या छिन्नी हतोडीने घडलेला आहे. हजारो वर्षांच्या इतिहास मंथनाचे पडसाद आणि प्रतिसाद प्रत्येक भारतीयाच्या घडण-मोडणीतून ठळकपणे दिसतात. आपल्या चाली-रीती, रुढी परंपरांमधुन या संस्कृतीच्या पाउलखुणा उमटतात. आणि याचा रंग इतका गाढा आहे कि भारतीय व्यक्ती जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात गेला तरी तो या संस्कृतीची चौकडी उभारतो आणि वैयक्तिक आयुष्य त्यात कंठण्याचा प्रयत्न करतो. प्रसिध्द इंग्रजी भाषेतील लेखक विद्याधर नायपॉल त्यांच्या लहानपणीच्या आठवणींमधुन हे प्रकर्षाने जाणवत. त्यांचे पणजोबा (नायपॉल स्वतः ऐंशी च्या घरात आहेत) बिहार सोडुन ब्रिटिश नावेतून वेस्ट इंडिज मधे दाखल झालेत. म्हणजे साधारण सन १८५० च्या कालावधीत. ब्रिटिश साम्राज्याला तेंव्हा ऊसाच्या लागवडीत मजदूर लागत म्हणुन ते भारतीयांना तिथे घेउन जाउ लागलेत. सौदा असा की पाच वर्ष ऊसाच्या लागवडीवर पगारी मजदूरी करायची. पाच वर्षांनंतर एकतर परतीचे तिकिट मोफत मिळेल किंवा वेस्ट इंडिज मधेच जमिनीचा तुकडा मिळेल. बहुतांश गेलेले लोक तिथेच स्थायिक झालेत. भारतात तेंव्हा आर्थिक परिस्थिती नामुष्कीच होती त्यापेक्षा भारत सदृश्य हवामान असलेल्या पृथ्वीच्या दुसर्‍या टोकाला स्थायिक होणे सुसह्य होते. नायपॉलांनुसार या नव स्थायिकांनी भारतीय समाजाची पुनारावृत्ती वेस्ट इंडिज मधे केली. तिथल्या नद्यांना गंगा नाव देण्या पासुन ते भारतातले सणवार उपलब्ध सामुग्रीने साजरी करण्या पर्यंत सगळ आठवणींमधुन अगदी जातीभेदही या लोकांनी कायम ठेवलेत. हे उदाहरण देण्यामागचा उद्देश असा की परदेशात स्थायिक होण्यार्‍या सगळ्या भारतीयांनी भारतीय समाजाशी निष्ठा बाळगली आणि त्याच्या मागे एक महत्वाचे कारण आहे. सन १८५० च्या जमान्यात वेस्ट इंडिज ला जाणार्‍या भारतीयांचा भारत देश आपल्या भारत देशापेक्षा वेगळा होता (पाकिस्तान, बांग्लादेश भारतातच गणल्या जात होते) आणि भारत देशाची व्याख्या जरी पुढल्या शंभर वर्षात झपाट्याने बदलत गेली तरी वेस्ट इंडिज मधील भारतीय समाजाशी नात जोडल्यामुळे या लोकांना स्वतःची ओळख कायम ठेवता आली. भारत स्वातंत्र्याचा लढा, भारत या भौगोलिक प्रदेशाचा सन १९४७ साली झालेला उदय इत्यादी घटनांशी परदेशस्थ भारतीयांचा तिळमात्र संबंध नाही आणि संबंध ठेवायचा म्हटला तरी कसा ठेवणार?


माझा क्रिकेटशी संबंध फक्त क्रीक-इंन्फो वरील लेख वाचण्यापूर्तीच आहे. मी शेवटली पूर्ण मॅच सन २००३ च्य वल्ड कप ची बघितली असणार. भारत २०१२ विश्व चषक जिंकल्याच मला माहिती होत (मी फक्त तेंडुलकरची बॅटिंग बघितली आणि तो बाद झाल्यावर रागाने रिमोट फेकुन झोपायला गेलो!) पण त्या दिवशी बायको सोबत जेवायला गेलो होतो तर दुकानाच्या मालकाने जिलब्या आणुन दिल्यात, भारत विजयी ठरला म्हणुन. जणु काही त्याच्या घरच लग्न आहे या थाटात तो येणार्‍यांना जिलब्या वाटत होता. अमेरिकतल्या मोठ्या शहरांमधे तर जल्लोषाने हा क्षण मनविल्या गेला. हा वि़जय मनविणार्‍यामधली बहुतांश जन नुकतेच भारतातून अमेरिकेत दाखल झालेली आहेत. या लोकांच अजुनही भारतात जाण-येण होत असत, बहुतांशांची लग्नहि भारतातलीच. पण जी लोक साधारण २५-३० वर्षांपूर्वी अमेरिकेत आलीत त्यांचा आता भारताशी संबंध कमी होत गेल्याच दिसत. हि लोक दिवाळी जोरात साजरी करतात पण आता भारतातील घडामोडींशी त्यांचा फारसा संबंध नसतो. क्रिकेट, राजकारण इत्यादी विषयांवर खुप वर्ष अमेरिकेत राहिलेल्या भारतीयांना फारसा जिव्हाळा नसतो. आणि का असावा? आपण आता कायमचे अमेरिकेतच रहाणार आणि आपल्या पुढल्या पिढ्या सुध्दा अमेरिकेन असणार हि सत्याची जाणीव झाल्यावर भारत देशाशी संबंध तुटतो. मग मंदिर बांधुन, धार्मिक संस्था टाकुन परंपरा जपण्याचा आणि पुढल्या पिढीवर संस्कार बिंबविण्याचा प्रयत्न सतत केल्या जातो.


स्वातंत्र्य उत्सवाची मिरवणुक निघाली तर त्यात भारताचा झेंडा अग्रगण्य होता पण त्या सोबत गणपतीची आवश्यकता होती. जन-गण-मन सगळ्यांनी ताठ उभ राहुन गायल पण गणपती बाप्पा मोरया चा गजर त्याच्या मागोमाग झाला. स्वातंत्र्य उत्सव साजरी करणे म्हणजे भारत देश आणि भारतीय समाज याचा संगम होय. कालनीय उत्क्रांतीच्या पायर्‍या चढतांना परदेशी भारतीय हा सोनेरी दोराचा आधार घेतो एवढच.


भारत ही एक सतत बदलणारी व्याख्या आहे. कालचा भारत वेगळा होता आणि उद्याचा भारत फार वेगळा असणार पण भारताची एक प्रतिमा मनात बंद करुन नविन किनारे गाठणार भारतीय माणुस या समाजनिष्ठे मुळे सदैव भारतीयच रहाणार ही आनंदाची गोष्ट नाही का?