7/28/13

पेशवाईच्या सांन्निध्यात

पेशवाईचा अभ्यास मी फार अलिकडेच सुरु केला. मला इतिहास वाचनाची फार लहानपणा पासुन आवड आहे. भारतीय इतिहासाबद्दल वाचन मुख्यतः मुसलमानी आक्रमण, त्यामगची कारण (यावर फारस काही उपलब्ध नाही) आणि शिवशाही एवढेच सिमित होते. अर्थात हे विषय भारताच्या गेल्या हजार वर्षांच्या इतिहासातील फार मोठा कालावधी व्यापतात. पण सन १७०० ते १८०० च्या दरम्यान भारताचा चेहरा-मोहरा बदवुन टाकणारी आणि रणधुरंधर अश्या पेशवाई सत्तेवर मी काहीच फारस वाचल नव्हत. शालेय इतिहासात तर पेशव्यांचा उल्लेख पण नव्हता. आता भारतीय सरकार मुसलमानी मुघलाईला भारताचा सुवर्ण काळ मानत असेल तर हिंदू मराठेशाही आणि पेशवाई बद्दल कस शिकवणार? हा मुद्दा एका स्वतंत्र लेखाचा विषय ठरेल.

पेशवाई नावारुपास जरी थोरल्या बाजीरावांच्या काळात आली तरी या पदाची मूळ खुद्द शिवाजींच्या दरबारात रोवली होती. महाराजांच्या मंत्री मंडळात नेहमीच पंत-प्रतिनिधी असे. मोरोपंत पिंगळे हे नाव साधारणतः सगळ्यांना महिती असते. राज्याभिषेका नंतर त्यांच्या अष्टप्रधानां पैकी मानाची पहिली जाग पंत-प्रतिनिधींना होती. जरी तो काळ तलवारीचा होता तरी राजांनी प्रधानमंत्रीला सेनापतीच्या आधी मान दिला ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे. महराजांच्या काळात या पदाला पंत-प्रतिनिधी अस म्हणल्या जात असे त्याच रुपांतर पुढे पेशवा हे कसे झाले याची माहिती मला कुठे वाचायला मिळाली नाही. पण माझ्या मते पेशवा हा शब्द फारसी आहे. इराणी दरबारात पंत-प्रतिनिधीला पेशवा म्हणल्या जात असे. माझ्या मते दख्खनी मुसलमानी दरबारांमधे असली पदवी मूळरुपी आली असणार आणि पुढे मराठी दरबारात ती पोचली असणार. साधारणतः सर्व पेशव्यांना श्रीमंत याच आदरार्थी नावाने संबोधित केल्या जात असे.

मराठी दरबारात महाराजांनी कुठलेही पद वांशिक केले नव्हते. म्हणजे पंत-प्रतिनिधींचा वंशज त्याच पदावर बसेल असे नाही. हि प्रथा सर्वप्रथम छत्रपती शाहु महाराजांनी सन १७१२-१३ ला रूढ केली. बाळाजी विश्वनाथ भट या हुन्नरी, शूर आणि तल्लख डोक्याच्या माणसाला त्यांनी पेशवा बनविले. बाळाजी विश्वनाथ यांच्या पूर्वायुष्याची फारशी माहिती उपलब्ध नाही. पण मराठी राजकारणात आणि मुख्यतः मुघली सत्तेशी चाललेल्या संघर्षात त्यांनी तलवार आणि बुद्धी दोहोंचे पाणी दाखवले. सन १७१२ (१८?) चा दिल्लीचा तह ज्यात मुघल मराठ्यांचे मांडलिक झाले त्यात बाळाजी विश्वनाथांनीच मराठी दरबाराचे नेतॄत्व केल. सन १७२० ला त्यांच्या मृत्यु नंतर शाहु महाराजांनी त्यांच्या मोठ्या मुलाला - बाजीराव विश्वनाथ भट, पेशवेपद बहाल केल. या पेशव्याला आपण थोरले बाजीराव नावाने ओळखतो. पेशवाईची खरी सुरुवात थोरल्या बाजीरावांच्या काळात झाली अस म्हणायल हरकत नाही. मुत्सद्दीपण, अलौकीक शौर्य, माणस जोडण्याचा जन्मजात गुण आणि अविरत कष्ट करुन राज्य जोडण्याची वृत्ती बघता छत्रपती शिवजींचे खरे वंशज थोरले बाजीरावच. मराठा दरबाराची भरभराट, राज्यवर्धन, राज्याचा जरब आणि उत्कृष्ट प्रतीचे पुढल्या पिढीचे सरदार हे सगळ थोरल्या बाजीरावांच्या जमान्यतच घडल.

या लेखात पेशवाईचा इतिहास लिहिण्याचा मानस नाही. त्यासाठी लेखमालिकाच लिहावी लागेल. प्रत्येक पेशवा - थोरल्या बाजीरावांपासुन ते राघोबा दादांपर्यंत सगळेच्या सगळे अव्वल दर्ज्याचे लढवय्ये आणि मुत्सद्दी होते. नुसते पेशवेच नाहीत तर मराठी दरबारातील सरदार - होळकर, शिंदे, गायकवाड, भोसले (नागपूर) तत्सम घराणीही स्वतंत्र लेखमालिकेच्या लायकीचे होते. या काळातील एक-एक पेशवा किंवा सरदार वेगळ्य काळात जन्मला असता तर त्याने तो काळ एकट्यानेच गाजवला असता. विशीच्या पोरांनी पूर्ण हिंदुस्तात पादाक्रांत केला. थोरले बाजीराव विसाव्या वर्षी पेशवे झालेत आणि तडाक्याने त्यांए दिल्ली गाठली. सदाशिवरावभाउ पानिपताच्या युद्धात अवघे तिशीचे होते तर विश्वासराव सोळा! महादजी शिंद्यांची पहिली स्वारी बाराव्या वर्षीची होती अस म्हणतात. सवाई माधवरावांच्या काळात म्हणजे पानिपत पराभवोत्तर काळात मराठी सत्ता दिल्ली ते चेन्नई आणि कोंकण ते बंगाल पर्यंत पसरली होती. हैद्राबादचा निजाम ते दिल्लीचा नाममात्र मुघल पुण्याचे मांडलिक होते. सन १७०० मधे केवळ थोडीशी कोंकणपट्टीत उरलेल मराठी साम्राज्य पेशवाईत चारही दिशांत फोफावल. पण आपल दुर्दैव अस की या एका पेक्षा एका सरदारांपैकी कोणालाही फारशी आयुष्यरेखा लाभली नाही. सगळे पटापट मेलेत. भट घराण्यातल्या सहा पिढ्या शंभर वर्षात आटपल्यात. तिच दशा होळकर, शिंदे इत्यादी घराण्यातली. म्हणजे छत्रपतींच्या काळापासुनचा पन्नाशी न गाठण्याची दुर्दैवी कहाणी पेशवाईतही अखंडीत राहिली. 

अर्थात या काळात चुका झाल्या नाहीत अश्यातला भाग नाही. राज्यकारभार आणि राज्यविस्तार यात चुका होणारच आणि झाल्यात. काही चुका तर बुद्धी चरायला जाण्याची ज्वलंत उदाहरण आहेत. महाराजांनी त्यांच्या आयुष्यात जे निर्णय घेतलेत आणि कामगिर्‍या निभावल्यात तसाच कित्ता गिरवला असता तर यातल्या काही चुका टाळता आल्या असत्या पण मला हे सगळ तीनशे वर्षांनी लिहिण सोप आहे. त्याकाळात प्राप्त परिस्थितीत जे काही पेशवा मराठी दरबारात मिळवल ते बघता हा काळ भारताच्या वैभवशाली इतिहासात गणायला हवा.

१७ व्या शतकातल्या मराठी रक्ताची रग अंशतः या काळात उतरली तर भारत खरच विश्वसत्ता बनेल.

पेशवाईतील काही घटनांवर विस्तृत लेखन करण्याचा मानस आहे. संधी मिळताच या कामाचा श्री करीन.