2/18/08

श्री गणेश वंदना - भाग २

'प्रज्ञाभारती' श्रीधर भास्कर वर्णेकरांची ॥सुबोध ज्ञानेश्वरी॥ वाचायला सुरुवात केल्यावर मला मी मराठी असल्याचा खराखुरा अभिमान वाटु लागला. एकतर ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर लिहिलेल्या भावार्थदिपिकेचा सुगंध ९०० वर्षांनंतरही अजुनही दरवळतो आहे. पण त्यापेक्षाही त्यांनी जन्म दिलेल्या मराठी भाषेत ९०० वर्षांनंतरही वर्णेकरांसारखे दीप मराठी मने अजुनही उजळुन टाकता आहेत.

मी प्रत्येक ओवीचे विश्लेषण देउ शकत नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांनी श्री गणेशाच्या मूर्तीचे जे वर्णन केलेले आहे, गणपतीच्या प्रत्येक आंगाला जी उपमा दिलेली आहे त्यावर माझ्या अल्प-मतीनुसार थोडा प्रकाश टाकु इच्छितो. थोर-मोठ्यांनी माझी ही धीटाई पदरी घ्यावी.

ज्ञानेश्वरीच्या आरंभीच ज्ञानेश्वर महाराजांनी गणेश वंदने द्वारे भाविकांना केवळ मंत्र-मुग्धच नव्हे तर भारतीय संस्कृतीची महानता येथे साक्षात गणपतीचा मान देउन ज्ञानेश्वर महाराजांनी सिध्द केलेली आहे.

"हे अशेष शब्दब्रह्म। तीच तुझी मूर्ती उत्तम।
वर्ण हीच कान्ति मनोरम । तुझ्या मूर्तीची॥

स्मृती हे तुझे अवयव। ज्यांचा अवर्णनीय आंगीकभाव।
अर्थशोभा ही ठेव। लावण्याची॥

अष्टादश पुराणे। तीच मणिभूषणे।
पदरचना घाट, प्रमेये कोंदणे। त्यामध्ये रत्नांची॥

श्री गणेश वंदनेची सुरुवात ज्ञानेश्वर महाराजांनी गणपतीला शब्दब्रह्माची उपाधी दिली आहे. आपल्या संस्कृतीत ब्रह्मा जन्म देतो, विष्णु कर्ता-करविता तर शंकर पूर्ण-विराम देतो असे मानल्या जाते. गणपती विद्येचे दैवत आहे. अर्थात, शब्दाला जो जन्म देतो, उत्पन्न करतो किंवा शब्दाचे बीज ज्यात आहे त्या मनोरम कांती असलेल्या, अशेष म्हणजे ज्याचा आरंभ नाही अश्या गणेशाला वंदन करुन ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थदिपीकेचा आरंभ केला आहे.

पुढं गणपतीच्या प्रत्येक अंगाला ज्ञानेश्वर महाराजांनी सनातन संस्कृतीच्या धर्म-ग्रंथ तसेच विविध तत्त्वज्ञानांची उपमा दिली आहे. भारतीय धर्म ग्रंथ श्रुति व स्मृती या दोन भागात विभाजित होतात.
श्रुति-ग्रंथ - चार वेद (रुग, साम, यजुर अथर्व) या वेदांवर विस्तृत भाष्ये किंवा विवरणे खालील ग्रंथांमधे समावेश होतो.
संहिता (ऋचांचा किंवा मंत्रांचा संग्रह)
ब्राह्मणे (आरण्यके)
उपनिषदें शास्त्रे किंवा
स्मृती - धर्मग्रंथ सूत्रे (षडदर्शने - यात जैमिनी (पूर्वमीमांसा व मीमांसा), ब्रह्म (वेदान्त, शारीरिक किंवा उत्तरमीमांसा), न्याय (गौतम), योग ( पातंजल) आणि सांख्य याचा समावेश होतो)
इतर सूत्रें - व्याकरण (पाणिनी), भक्तिमार्गाचे सूत्र-ग्रंथ (नारद, शांडिल्य)
इतिहास - रामायण व महाभारत
पुराणे - अष्टादष-महापुराणे, उपपुराणे व गीता.

केवळ वेदांनाच श्रुती मानण्याची पध्दत बहुतांश ठिकाणी आढळते. पण गीता-रहस्यात, लोकमान्य टिळकांनी उपनिषद, ब्राह्मणे व संहितांचाही समावेश श्रुतींमधे केलेला आहे.

गणेश वंदना वाचुन मला असा प्रश्न पडला की कुठल्याही वेदांचा उल्लेख न करुन ज्ञानेश्वर महाराजांनी वेदांना गणपतीहुन अधिक मान्यता तर नाही दिली? पण गणपतीला साक्षात शब्दब्रह्म मानिल्यावर वेद श्रेष्ट की गणपती श्रेष्ट हा विषय गौण ठरतो.

गणपतीच्या अंगांना स्मृतींची उपमा देतांना ज्ञानेश्वर महाराजांनी गणपतीलाच या अप्रतिम व सुंदर रचनांची अर्थाशोभा ठेवण्याची विनंती केली आहे. अर्थशोभा या शब्दाचा उपयोग येथे मला फार आवडला. शब्दांची सुंदरता त्यामागच्या अर्था मधे दडलेली असते. तो अर्थ सत्य दर्शवित असेल तरच त्या शब्दांचे सौंदर्य ताज्या फुलांप्रमाणे सदैव दरवळत राहिल. स्मृतींमधील तत्त्वज्ञान गेले हजारो वर्षे भारतीय मने उल्हासित करीत आहे. म्हणुन ज्ञानेश्वर महाराज गणपतीलाच या शब्दांचे सौदर्य टिकविण्याचे आवाहन करीत आहेत.

गणपतीची वस्त्रे व आभुषणांपासुन ज्ञानेश्वर महाराज गणेश-वर्णनाची सुरुवात करतात.
मुख्या आठ पुराणांना गणपतीच्या मुकुटातील मणिभूषणांची उपमा देउन, पुढे ज्ञानेश्वर महाराज पुराणांमधील पदरचनांना रत्नांमधील घाट मानिले आहे. या श्लोकात मला प्रमेय शब्दाचा उपयोग थोडा आश्चर्यकारक वाटला. गणपतीच्या मुकुटामधे मणिभूषणे ज्या खाचांमधे बसविली आहे त्या खाचांना ज्ञानेश्वर महाराजांनी प्रमेय म्हटले आहे. प्रमेय म्हणजे अचूक किंवा संपूर्ण ज्ञान. पुराणांपेक्षा उपनिषदांचा भारतीय तत्त्वज्ञानावर अधिक प्रभाव आहे तसेच पुराणांमधे बरेच विरोधाभास आहेत. पण प्रमेय शब्दाचा अजुन खोल विचार केला तर अस लक्षात येतं की कुठल्याही विषयावर कुठल्याही क्षणाला अचूक ज्ञान असेल तरी त्यास प्रमेय ज्ञान म्हणता येइल. म्हणजे, ते ज्ञान पुढे वृध्दींगत होउ शकते पण या घडीला जेवढ ज्ञान आहे ते अचूक असल्यामुळे ते प्रमेय ज्ञान. जानेश्वर महाराजांना बहुतेक पुढला अर्थ अपेक्षित असावा.

(क्रमशः)